शनिवार, ४ नोव्हेंबर, २०१७

किल्ले नांदगिरी

@किल्ले नांदगिरी@
सातारा शहराच्या पूर्वेला सह्याद्रीमधील महादेव रांगेचे एक शृंग आलेले आहे. या शृंगातच नांदगिरी ऊर्फ कल्याणगड उठावलेला आहे. पुणे ते सातारा या महामार्गाच्या पूर्वेला कल्याणगड हा किल्ला आहे. सपाट माथा असलेल्या या किल्ल्याच्या माथ्यावर असलेल्या एकमेव वटवृक्षामुळे हा किल्ला दूरूनही ओळखू येतो. सातारा जिल्ह्य़ातील माण, खटाव, कोरेगाव तालुक्यांचा भाग हा तसा दुष्काळी पट्टा! या भागात कुणी पर्यटनासाठी निघाल्याचे कधी कानावर येत नाही. खरेतर या भागातही गडकोट, सुंदर धाटणीची कोरीव मंदिरे, जुने वाडे असे बरेच पाहण्यासारखे आहे. पण या भागातल्या वैशाखवणव्यामुळे या स्थळांची पर्यटन चर्चा तशी अभावानेच होते. यालाही एक पर्याय आहे. पावसाळा सुरू झाला आणि घाटमाथ्यालगत तो धुमाकूळ घालू लागला की, खरेतर इकडे माणदेशी वळावे. हलका पाऊस, मधेच ऊन, हिरवे डोंगर अशा आल्हाददायक वातावरणात या भागातील भटकंती वेगळ्या जगात घेऊन जाते. आजचा आपला थांबा असाच देश पठारावरचा - नांदगिरी!

साताऱ्याहून लोणंदसाठी एक रस्ता गेला आहे. याला जुना पुणे रस्ता असेही म्हणतात. या रस्त्यावरील 'सातारा रोड' हा भाग तिथल्या कूपर उद्योगसमूहामुळे सर्व परिचित आहे. या 'सातारा रोड' च्या पुढेच हा नांदगिरी किल्ला! साताऱ्यापासून या 'सातारा रोड' पर्यंत येण्यासाठी नियमित एसटी बस सेवा आहे. या थांब्याच्या पुढे पंधरा-वीस मिनिटे चालले की, आपण गडाच्या पायथ्याशी असलेल्या नांदगिरी गावी येतो. या गावाजवळील धुमाळवाडीतूनच या छोटेखानी गडावर वाट निघते. खरेतर 'सातारा रोड' भागात आल्यावरच 'नांदगिरी' दिसू लागतो. एखाद्या जहाजाप्रमाणे त्याचा आकार! तसेच त्याच्या माथ्यावरील तो एकुलता एक वटवृक्षही आपले लक्ष वेधून घेत असतो. समुद्रसपाटीपासून अकराशे मीटर उंचीवर हा गड!  देश-पठारावरच्या या गडाची एक गंमत, हे एकतर उंचीने तसे बेताचे आणि त्यातच उघडा माळ यामुळे गडाची सरळ वाट कुठेही न चुकवता अवघ्या अध्र्या-एक तासात गडाच्या दारात पोहोचवते. तत्पूर्वी वाटेत ऐन कातळात खांब सोडून खोदलेले एक टाके दिसते. खांब सोडत टाके खोदण्याची पद्धत प्राचीन! त्यामुळे या गडाचे प्राचीनत्वाशी असलेले नाते आपोआपच सिद्ध होते. कडय़ाला समांतर असा गडाचा पहिला दरवाजा येतो. त्याची कमान, भोवतीचे बांधकाम अद्याप उत्तम; परंतु त्यालाच आता एक लोखंडी दरवाजा बसवला आहे. या दरवाजातच पाण्याची मोठी टाकी आणि त्यापाठीमागे एक नव्याने खोलीही काढलेली. चौकशी केल्यावर समजले की, कुणा बुवा-महाराजांनी इथे त्यांचा संसार थाटला आहे. आमच्याकडे पुरातत्त्व खात्याच्या कृपेने निराधार झालेल्या अनेक गडकोट, लेण्या, मंदिरांमध्ये या अशा बुवा-महाराजांनी आपले बस्तान बसवलेले आहे. त्यांच्या निव्वळ ध्यानधारणा, पूजेला विरोध असण्याचे कारण नाही, पण ही मंडळी ऐतिहासिक वास्तूंमध्ये हे असे परस्पर फेरफार करत स्वत:चे नवे कार्य (?) उभे करतात त्या वेळी मात्र आमच्या इतिहासाला मोठा धोका निर्माण होतो.

या दरवाजातून एक मार्ग गडावर, तर दुसरा समोरच कडय़ाच्या कडेने खाली एका गुहेत उतरतो. ही गुहा म्हणजे नांदगिरीचे अद्भुत लेणे! नांदगिरीचे सारे वैभव-आकर्षण या लेण्यात! आत शिरण्यासाठी खाली एक अरुंद मार्ग आहे. खाली वाकत आत शिरावे तो अंधाराबरोबरच गुडघाभर पाणीदेखील भय दाखवत पुढे येते. कुठे जमिनीखाली-कातळाच्या पोटात खोदलेले लेणे, डोळ्यात बोट जाईल असा अंधार आणि आता सोबतीला हे पाणी.. पहिल्या पावलाबरोबरच अंगावर शिरशिरी उभी राहते. एका लोखंडी कठडय़ाचा आधार घेत त्या अंधारातून पुढे सरकायचे. तब्बल ३५ मीटर आतपर्यंतचा हा प्रवास! एक-दोन पावले टाकली की, सरावलेल्या डोळ्यांना थोडे दिसायला लागते. दोन्ही बाजूंना खोदकाम केलेले. या सर्वच दालनात पाणी भरलेले. मूळ लेणे खोदले असतानाच त्याच्यात कुठूनतरी हे पाणी झिरपू लागले आणि आता याचे जललेणे झालेले. खरेतर पाणी झिरपू लागल्याने आपल्याकडील अनेक लेण्या बाद झाल्या. पण नांदगिरीच्या या लेण्याचे सौंदर्य या पाण्याने आणखी वाढले आणि त्याचे जललेणे झाले. लेण्याच्या अगदी शेवटी काही छोटय़ाशा खोल्या. त्यातील एकात मंद तेवणारा दिवा होता. ज्योतीच्या त्या तेवढय़ाशा प्रकाशानेही त्या अंधाऱ्या गुहेत चैतन्य निर्माण झाले होते. या ऊर्जेतूनच पावले झपझप त्या दालनापुढे आली आणि अंधार, काळोख, भीती हे सारे भाव गळून जात एक शांत-प्रसन्न दर्शन घडले. काळ्या पाषाणातून उमललेले ते रूप! ध्यानस्थ बैठक, दोन्ही हात नाभीपाशी एकवटलेले, नेत्र अंतर्धान पावलेले आणि साऱ्या शरीरावरच समाधीयोगाची प्रसन्न छटा पसरलेली! डोक्यावर सात नागांचा फणा धारण केलेले हे पाश्र्वनाथाचे रूप! साधारण नवव्या शतकातील ही मूर्ती. बहुधा ही लेणीही त्याच काळातील असावी. या पाश्र्वनाथाला स्थानिक लोक पारसनाथ म्हणतात. दत्ताशी त्याचे नाते जोडतात. यातूनच मग अन्य एका कोनाडय़ात दत्तात्रेयांच्या संगमरवरी मूर्तीची स्थापना झाली. अन्य एका ठिकाणी देवीची एक मूर्तीही दिसते. पाण्यात उभे राहून एखादे लेणे पाहणे-अनुभवणे ही कल्पनाच निराळी. पाण्याला पायाने दूर सारत त्याचे एकेक दालन पाहू लागायचे. अंधार-काळोख आणि पाण्याने भरलेली ही दालने. पण त्यातही गूढ भाव जाणवू लागतात. भय आणि प्रसन्नतेच्या मिश्र छटा स्पर्श करतात आणि प्राचीनत्वाचा वास काळाच्या खोल-खोल उदरात घेऊन जातो.

नांदगिरीचे हे जललेणे एका वेगळय़ाच जगाचे दर्शन घडवते. अशा या लेण्यांचे दर्शन घेण्यापूर्वी थोडीशी सावधानता हवी. अशी एकांतस्थळे जशी साधक-तपस्वींना आवडतात, त्याचप्रमाणे ती कडय़ाकपारीत पोळी बांधणाऱ्या मधमाश्यांनाही भावतात. नांदगिरीच्या या लेण्याच्या भाळीही अशी आग्यामाश्यांची चांगली दोन-चार मोठाली पोळी आहेत. तेव्हा सुसाट वागणाऱ्या, गोंधळ घालणाऱ्या, विडी-काडी ओढणाऱ्यांनी अशा पवित्र जागांपासून थोडेसे दूरच राहावे, नाहीतर या माश्या त्यांचा इंगा दाखवतील. असो! नांदगिरीचे हे जललेणे पाहात पुन्हा पहिल्या दरवाजातून वर गडाकडे सरकावे. लगोलग दुसरा दरवाजा. यानंतर आतमध्ये उजव्या हातास गडाची रक्षणदेवता मारुती रायाचे मंदिर! यानंतर थोडे वर चढून आले, की गडमाथा येतो. नांदगिरी दक्षिणोत्तर पसरलेला. अरुंद असलेल्या या गडमाथ्यावर दोन-चार मोठाली तळी, खडकात खोदलेली काही टाकी, शिबंदीच्या घरांचे अवशेष, धान्य आणि दारुगोळय़ाची कोठारे आदी वास्तू दिसतात. सुरुवातीलाच एक तळे हिरव्या रंगाचे पाणी दाखवत येते. या तळय़ाच्या काठावर एक समाधीही आहे. ती कुणाची हे मात्र कळत नाही. याच्या बाजूलाच चुन्याची घाणी आहे. त्याचे ते दगडी चाक आजही इथे त्या इतिहासातील आठवणी सांगत असते. या तळय़ाला खेटूनच शिबंदीच्या घरांचे अनेक अवशेष दिसतात. या अवशेषांमधून  एक वाट दक्षिणेकडे निघते. या दक्षिण भागातच खालून खुणावणारा  तो विशाल वटवृक्ष आपल्या पुढय़ात येतो. या वटवृक्षाच्या छायेतच कुणा अब्दुल करीम नामक पिराचे एक थडगे आहे. या परिसरात गडावरील एखाद्या प्राचीन वास्तूचे कोरीव दगडही अस्ताव्यस्त पडलेले दिसतात. बहुधा इथे एखादे प्राचीन मंदिर असावे. दक्षिणेप्रमाणे उत्तर बाजूसही काही अवशेष आहेत. गडाच्या चारही बाजूस कडे असल्याने आवश्यक त्या ठिकाणीच तटबंदी घातलेली आहे. नांदगिरीचे हे दुर्गदर्शन झाले की, लक्ष भवतालाकडे वळते. नांदगिरीवरून अनेक दुर्गशिखरे खुणावतात. यातील काहींवर गडकोटांची शेलापागोटीही चढवलेली आहेत. जरंडेश्वर, अजिंक्यतारा, चंदन-वंदन, वैराटगड, किन्हईचा डोंगर, त्यापाठीमागे दूरवर औंधच्या यमाईचा डोंगर अशी दूरदूरची गिरिशिखरे खुणावतात. गडाभोवतीचा हा प्रदेश उजाड-दुष्काळी, त्यातूनच वग्ना आणि वसना या नद्या त्यांची कोरडी पात्रे घेऊन वाहतात. एरवी शुष्क-करपलेली ही पात्रे पावसात थोडीफार पाझरतात. दूरवरचा तो खटावचा तलाव दिसतो. हा सारा भूगोल पाहता-पाहताच मग लक्ष पुन्हा गडाच्या मुळाशी म्हणजेच त्याच्या इतिहासापाशी येऊन ठेपते.

नांदगिरीची निर्मिती कोल्हापूरच्या राजा भोजची! त्याच्यानंतर तो आदिलशाही-निजामशाही या मुस्लिम सत्ताधीशांकडे होता. छत्रपती शिवरायांनी परळी (सज्जनगड), सातारा (अजिंक्यतारा) घेतल्यावर लगेचच हा किल्ला घेतला. या गडाची 'कल्याणगड' ही दुसरी ओळख बहुधा शिवकाळानंतरचीच असावी. पण याचे कारण समजत नाही. शिवकाळानंतर पंतप्रतिनिधी आणि त्यानंतर पेशव्यांकडे गडाचा ताबा होता. याच काळात इसवी सन १७९१ मध्ये इंग्रज अधिकारी मेजर प्राईस याने नांदगिरीची पाहणी केली होती. त्याच्या या भेटीच्या आधारे तो त्याच्या 'मेमरिज ऑफ फिल्ड ऑफिसर' या ग्रंथात म्हणतो,  'It look like hull of a ship of war!'. मराठय़ांच्या कारकिर्दीत नांदगिरी हे तालुक्याचे ठिकाण होते. या गडावर सरकारी तिजोरी होती. किल्ल्याचा कारभार पाहण्यासाठी मामलेदार, फडणीस, हवालदार, दफेदार, कारकून, नाईक आदी हुद्देकरी नेमले होते. एकूणच यामुळे नांदगिरी आपले महत्त्व टिकवून होता. गडावरचे मराठय़ांचे हे राज्य १८१८ च्या शेवटच्या मराठे-इंग्रज युद्धापर्यंत कायम होते. त्या वर्षीच्या एप्रिल महिन्यातच इंग्रजांनी त्यावर कब्जा मिळवला आणि नांदगिरीचे 'दुर्गवर्तमान' संपून 'इतिहासपर्व' सुरू झाले.

इंग्रजांनी गड जिंकल्यावर त्याची दुर्ग म्हणून असलेली सर्व शक्ती नष्ट केली. तट-बुरुज, इमारती पाडल्या, तोफा पळवल्या, दारूकोठारे उद्ध्वस्त केली. सारा किल्ला एक स्मशान झाला. गडाची ताकद त्याच्या आक्रमण आणि संरक्षणामध्ये! किल्ल्याची हीच ताकद ब्रिटिशांनी अन्य किल्ल्यांप्रमाणे इथेही नष्ट केली. या दरम्यान पुढे १८६२ मध्ये एक ब्रिटिश अधिकारी या किल्ल्याच्या भेटीवर आला होता. या वेळी त्याने 'एक भग्न, बेवसावू आणि निर्जन किल्ला' अशी नांदगिरीची उपेक्षा केली. आज एकविसाव्या शतकातही यात फारसा फरक पडलेला नाही. दुर्दैवाने ब्रिटिशांनी दिलेला हा 'वारसा' आम्ही आजही जतन केला आहे.

शुक्रवार, ३ नोव्हेंबर, २०१७

सातारा प्राथमिक माहिती 2

सातारा हे शहर महाराष्ट्र राज्यात सातारा जिल्ह्यात येते. सातारा हे नाव शहराला त्या भोवती असलेल्या सात टेकड्यांमुळे पडले आह, असे म्हणतात. हे शहर  कृष्णा-वेण्णेच्या संगमावर वसले आहे. हे शहर पुणे-बंगलोर महामार्गावर पुण्याच्या दक्षिणेस १०० किलोमीटर अंतरावर आहे. सातारी कंदी पेढा जगप्रसिद्ध आहे. तसेच या शहराला ऐतिहासिक वारसा ही लाभलेला आहे. पूर्वी हे शहर मराठ्याची राजधानीही होते.
सातारा शहर इतिहासात मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून प्रसिद्ध होते. १७०८ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती शाहूमहाराज यांचा राज्याभिषेक सोहळा सातारा शहरात झाला. त्यानंतर मराठा राज्याच्या अखेरपर्यंत सातारा शहर मराठ्यांची राजधानी होते. सातारा

सातारा शहरचे जगाच्या नकाशावरचे स्थान १७.६९१३९° उत्तर अक्षांश, ७४.०००७२° पूर्व रेखांश असे आहे.
सातारा शहर अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी वसले आहे. सातारा शहराच्यादक्षिणेकडे अजिंक्यताराउत्तरेकडे पेढयाच्या भैरोबाची टेकडी, पश्चिमेकडे यवतेश्वराचाडोंगर व पूर्वेकडे जरंडेश्वराचा डोंगर या टेकड्यांनी वेढले आहे. शहराजवळून कृष्णा ववेण्णा या नद्या वाहतात. माहुली इथे या दोन्ही नद्यांचा संगम होतो. सातारा शहराच्या पश्चिमेकडील कासचे पठार वनौषधींसाठी प्रसिद्ध आहे. शहरातून ह्याच टेकडीकडे पाहिल्यास मृत ज्वालामुखीचे मुख दिसते. सातारा शहराच्या पश्चिमेकडे असणारी ही डोंगराची रांग पश्चिमघाटात मोडते. त्यामुळे सातार्‍यात पावसाचे प्रमाण खूप आहे. सातार्‍यात प्रतिवर्षी साधारण १००० मिलिमीटर एवढा पाऊस पडतो.

शाहुनगर

● सातारा शहराची स्थापनाचे संभाजीचे पुत्र छत्रपती थोरले शाहूमहाराज यांनी केली. ● औरंजेबाच्या कैदेतून सुटून आल्यावर शाहूमहाराजांनी सातारच्या किल्ल्यावर (अजिंक्यतार्‍यावर) आपल्या राज्याभिषेक करवून घेतला व सातारच्या किल्ल्यावरूनच त्यांनी राज्यकारभाराची सूत्रे हलवण्यास सुरुवात केली. अडचणीत सापडलेले मराठा साम्राज्य शाहूमहाराजांच्या समयसूचक धोरणांमुळे हळू हळू मोकळा श्वास घेऊ लागले. विखुरलेले एक एक मराठा सरदार एकत्र करून त्यांच्यात स्वराज्याची ऊर्मी नव्याने जागृत करत शाहूमहाराजांनी मराठा स्वराज्याला मराठा साम्राज्याचे स्वरूप देण्यास सुरुवात केली. मराठा साम्राज्याचा चहूबाजूला जसाजसा विस्तार होऊ लागला तसातासा सातारच्या किल्ल्याचा परिसर प्रशासनच्या दृष्टीने कमी पडू लागला व त्यातूनच सातारा शहराच्या स्थापनेची कल्पना पुढे आली आणि शहराची मुहूर्तवेढ रोवत शाहूमहाराजांनी मराठा स्वराज्याच्या ७० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच स्वराज्याची राजधानी डोंगरावरून जमिनीवर आणली. ● सातारा शहराची अर्थात शाहूनगरीची रचना व त्यातील भागांची नवे शाहूमहाराजांच्या आमदनीची आठवण करून देतात. राजकीय महत्त्व संपले तरीही मराठा साम्राज्याची एकेकाळची राजधानी म्हणून सातार्‍याचा अभिमान महाराष्ट्रीयांना आजही वाटतो. शाहूनगरची स्थापना इ.स. १७२१ च्या सुमारास झाली. शाहूमहाराजांच्या दिनांक २८ मार्च १७२१ च्या पत्रात तातडीने वाडा बांधल्याचा उल्लेख आहे. शाहूमहाराजांच्या व पेशव्यांच्या ज्या भेटी होत त्या रोजनिशीत नोंदल्या आहेत त्यावरून शहर रचनेच्या कालावधीचा अंदाज लागतो. डिसेंबर १७२० च्या सुमारास श्रीमंत बाजीरावांनी सातारा किल्यावर शाहूमहाराजांची भेट घेतली. त्यानंतर सात-आठ महिन्यांच्या भेटी माची किल्ले सातारा येथे झालेल्या आहेत. त्यापुढे ऑगस्ट १७२१ ला शाहूनगरनजीक केल्ले सातारा येथे श्रीमंत बाजीरावांनी शाहूमहाराजांची भेट घेतली असा उल्लेख आहे. ● शाहूनगरालच हल्ली सातारा असे म्हणतात. शाहूमहाराजांनी स्वतःकरता दोन राजवाडे बांधले. येवतेश्वरच्या डोंगरातून नळ बांधून पाणी आणले. जागोजागी हौद तलाव बांधले त्यांनी शाहूनगरच्या वैभवात जास्तीत जास्त भर घालण्याचे प्रयत्‍न केले. ● शाहूनगरची रचना व प्रतिष्ठा शाहूमहाराजांच्या नजरेखाली पुष्कळ वाढली. व्यापार उद्योग वाढला. नवीन सावकार निर्माण झाले. सुखानंद, सुमेरगिरी, बन्सीपुरी अशा परदेशी सावकारांची वस्ती होणे सुरू झाले. मराठ्यांचा बाह्यउद्योग पसरत गेला, त्याबरोबर उत्तरेकडचे हिंदी लोक, वकील, व्यापारी, हुन्नरी कलावंत अशी अनेक माणसे दक्षिणेत आल्यामुळे शाहूनगरातील दळणवळण वाढून नगराचे जीवनस्तर उंचावले. त्याचबरोबर शाहूनगरचे वैभवसुद्धा विस्तारले. ● महाराष्ट्रातील पहिले नियोजनबद्ध शहर वसवताना शाहूमहाराजांनी तख्ताचा वाडा, रंगमहाल, पीलखाना, अदालतवाडा, बेगम मस्जिद असा अनेक भव्यदिव्य इमारतींची उभारणी केली.

१) तख्ताचा वाडा : हल्ली जिथे शाहू उद्यान आहे तिथे शाहूमहाराजांचा वाडा होता. तिथेच त्यांचे सिंहासन होते. म्हणून त्याला तख्ताचा वाडा म्हणत. जवळच लागून असलेल्या विहिरीस तख्ताची विहीर म्हणत. सध्या एक तटबंदीची भिंत व वाड्याच्या भिंतीचा अवशेष अढळतो.

२) रंगमहाल: रंगमहाल ही वास्तू अदालतवाड्याच्या पूर्वेस सुमारे २०० मीटर अंतरावर आहे. मूळ इमारत ३० मीटर लांब व १५ मीटर रुंद असून तिला ४५ मीटर रुंदीची नवीन इमारत जोडून बांधली आहे. मूळ इमारत ३ मजली होती. शाहूमहाराजांच्या राण्यांचा राणीवसा येथे होता म्हणून या इमारतीस रंगमहाल असे नाव देण्यात आले. राजमाता येसूबाईसाहेब देखील याच वाड्यात राहत असत. १८७४ साली लागलेल्या आगीत संपूर्ण रंगमहाल बेचिराख झाला. सध्या या वाड्याचा अर्धा भाग कूपर कारखाण्न्याच्या ताब्यात आहे.

३) अदालतवाडा : अजिंक्यतार्‍याच्या पायथ्याशी बोगद्याकडे जाणार्‍या रस्त्यावर शाहूमहाराजांच्या कालावधीपासून अस्तित्वात असलेल्या वस्तूचा महाराज न्यायालयासारखा उपयोग करीत. ही इमारत ६७. मीटर लांब व ४८ मीटर रुंद आहे. १८७६ पर्यंत या इमारतीचा उपयोग दिवाणी न्यायालय म्हणून केला जात असे. त्यानंतर मात्र नवीन राजवाड्याचा वापर न्यायालयासाठी होऊ लागला. सध्या अदालत वाडा हे सातारा राजकुलाचे शिवाजीराजे भोसले यांचे वसतिस्थान आहे.

४) बेगम मस्जिद: औरंजेबाची मुलगी बेगम झीनतउन्निसा हिने शाहूमहाराजांचा ते कैदेत असताना चांगला सांभाळ करून त्यांचे धर्मांतरण होऊ दिले नव्हते. झीनतउन्निसा बेगम १७२१ साली वारली. तिच्या स्मरणार्थ शाहूमहाराजांनी अदालत वाड्याच्या जवळच एक मस्जिद बांधली. आज त्या जुन्या मस्जिदीच्या जोत्यावर नवीन मशीद उभारली आहे.

सातार्‍यात म्हणजेच शाहूनगरमध्ये अनेक वाडे बांधण्यात आले होते. फत्तेसिंह वाडा, मंत्र्यांचा वाडा, शिर्के यांचा वाडा, पंडितरावांचा वाडा, तसेच मंगळवार पेठेत शाहूमहाराजांच्या पत्‍नी सगुणाबाई यांचा वाडा होता. तो वाडा आजही धनिणीची बाग म्हणून प्रसिद्ध आहे.

सातारा प्राथमिक माहिती

सातारा स्थान
देश        -   भारत
राज्य     -  महाराष्ट्र
विभाग   -  पश्चिम महाराष्ट्र
क्षेत्रफळ - १0,४८४ कि.मी वर्ग
ऊंची(AMSL)- ७४२मीटर
पिनकोड- ४१५००२
परिवहन नंम्बर- MH ११, MH ५०

गुरुवार, २ नोव्हेंबर, २०१७

स्वागत माझ्या नवनिर्मितब्लॉग मधे

मी लवकरच  येत आहे सातारचि विशेष माहिती असलेला नवीन ब्लॉग घेऊन ज्याच नाव आहे मुक्काम पोस्ट सातारा, ज्याचा उपयोग ज्ञानरंजन तसेच पर्यटकांसाठी होइल व त्याना इतनभुत माहिती मिळेल व सातारा पर्यटन आनंददायक व उत्साहपुर्ण होइल.